अकोला – अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र महायुतीचे उमेदवार अद्यापही निश्चित व्हायचे आहेत. अशातच महायुतीतील नेत्यांची मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावर भाजपसह महायुतीतील तीनही पक्षाच्या इच्छुकांकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी विद्यमान भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी दावा केल्याने महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणुक अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ला निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान राज्यातील राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र, जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघावरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाच्या दावेदारी वरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघासाठी तीनही पक्षातील इच्छुक पूढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोटमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केला आहे.
जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. पाच पैकी पाचही मतदारसंघ भाजपला मिळावे अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात असल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील घटकपक्षानीही पाच पैकी काही मतदारसंघावर दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बैठकीत पाचही मतदारसंघात भाजप निवडून यावी असे आदेश दिले होते. मात्र महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष जिल्ह्यातील अकोट आणि बाळापूर या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांनी अकोट आणि बाळापूर या दोन मतदारसंघावर दावा करत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोट मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हे मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा करीत येथील जनता आपल्या सोबत असल्याचं म्हणत दावा ठोकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया हे सलग तीन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. 2021 मध्ये अकोला स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून बाजोरिया नवीन संधीच्या शोधात असल्याची चर्चा आहे. सलग तीनवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिलेल्या बाजोरिया यांना यावेळी जनतेतून आमदार व्हायचं आहे. तर भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा त्यांना विश्वास आहे.
दरम्यान अकोट सह बाळापूर मतदारसंघातही महायुतीच्या तीनही पक्षात मोठी ओढाताण सुरू आहे. बाळापूर साठी भाजपसह सेनाही इच्छुक आहे. तर अजित पवार गटाचे संदीप पाटील यांनीही या मतदारसंघात शड्डू ठोकला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल सरप, रामेश्वर पवळ हे इच्छुक आहेत. त्यामुळे याही मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठी घमासान होण्याची शक्यता आहे. निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील महायुतीच्या घटकपक्षातील दावेदारी यामुळे उमेदवारी देतांना नाकीनऊ येणार आहे. शेवटी उमेदवार ठरतील ही मात्र नाराजांना नेमकं कशाप्रकारे शांत करण्यात महायुतीला यश मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.