हिंगोली – मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले होते. त्याची पडताळणी केल्यानंतर आज (२० ऑक्टोबर) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार आमदार बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगर यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात आवाहन केले की, बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना फोन पे करा, गुगल पे करा…काय लागते ते सांगा, गाड्या लावा, काहीही करा, पण मतदानासाठी आणा…बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांच्या याद्या दोन दिवसांत मला द्या.
उपरोक्त वक्तव्याची जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांना आमदार बांगर यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांगर यांना २४ तासांत खुलासा सादर करण्याच्या सूचना देणारी नोटीस बजावण्यात आली. त्याचा खुलासा बांगर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केला. त्याची शहानिशा आणि कार्यक्रमातील व्हिडिओची तपासणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी कोणतेही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झालं आहे ते सर्व चुकीचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही. तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो. फोन पे चा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नसल्याचे बांगर यावेळी म्हणाले.