मुंबई – दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी, ‘शिवसंग्राम’च्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पक्ष प्रवेशानंतर मेटे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असताना विधानसभा निवडणुकीचेच कारण आहे. आमची शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आमचा प्रस्ताव मांडलेला आहे. आमची यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही पक्षाने सांगितलेली सर्व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडणार आहोत.
ज्योती मेटे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्या आपली संघटना शिवसंग्राममधून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात होती. याआधी मेटे यांनी मनोज जरांगे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान आज (रविवारी) शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते- पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुतारी चिन्हावर त्या बीड विधानसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
बीड लोकसभा मतदारसंघातून मेटे या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, बीडमधून बजरंग सोनवणे यांना तिकीट मिळाले होते.