चेन्नई – नवविवाहीत जोडप्यांनी 16 मुले जन्माला घालावी असे आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केलेय. चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. अशाच आशयाचे विधान आध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले होते. त्यांच्या पाठोपाठ स्टॅलिन यांनी देखील असेच विधान केले आहे.
चेन्नईत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत 31 जोडप्यांचे लग्न झाले. यावेळी, कदाचित जोडप्यांनी 16 प्रकारच्या संपत्तीऐवजी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे, असे आवाहन स्टॅलीन यांनी केले. मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, आपली लोकसंख्या कमी होत आहे. याचा परिणाम आपल्या लोकसभांच्या जागांवरही होईल. यामुळे आपण 16-16 मुले जन्माला घालायला हवीत. स्टॅलीन यांनी दावा केला आहे की, पूर्वी जोडपे 16 प्रकारची संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद देत होते. यामुळे, कदाचित आता 16 प्रकारच्या सपत्तीऐवजी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे. पूर्वी ज्येष्ठ मंडळी तरुणांना आशीर्वाद देताना म्हणायचे की, 16 संतानं प्राप्त करा आणि समृद्ध जीवन जगा, याचा अर्थ 16 मुले नसून 16 प्रकारची संपत्ती असा होता.
याचा उल्लेख लेखक विश्वनाथन यांनी आपल्या पुस्तकात गाय, घर, पत्नी, मुले, शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोनें, संपत्ती, पीक आणि प्रशंसा, यांच्या स्वरुपात केला आहे. मात्र आता आपल्याला कुणीही 16 संपत्ती प्राप्त करण्याचा आशीर्वाद देत नाही, तर केवळ पुरेशी मुले होण्याचा आणि समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद देतात. यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, एन. चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी वाढत्या वृद्ध लोकसंख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. याचा हवाला देत त्यांनी दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते.