मुंबई – मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय रणनिती आखत विधानसभेतील आगामी निवडणुकांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलक जरांगे यांनी एक स्पष्ट आणि तीन टप्प्यांमधील कार्यक्रम आखला आहे, त्यामुळे मराठा समाजाला निवडणुकांमध्ये राजकीय बळ मिळवून देता येईल, असा त्यांचा अंदाज आहेे. पहिल्या टप्प्यात जरांगे पाटील यांनी ज्या मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात तिथे आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसऱ्या टप्प्यात, एस.सी., एस.टी. राखीव मतदारसंघांमध्ये, मराठा समाजाचे मतं त्या उमेदवाराला दिली जातील, जो मराठा आरक्षणाची बाजू मांडेल, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. जर उमेदवार उपलब्ध नसेल, तर अपक्ष उमेदवार दिला जाईल आणि मराठा, मुस्लिम, दलित समाजाचे बळ देऊन त्याला विजयी करण्याची योजना आखली आहे. तिसऱ्या टप्प्यात, जिथे त्यांचा उमेदवार नाही तिथे संबंधित उमेदवाराकडून मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमती मिळवून ती लिखित स्वरूपात घेतली जाईल. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, समाजाच्या ताकदीचं प्रदर्शन करण्याचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि एकजूट दाखवून मराठा समाजाला राजकीय मंचावर नेण्याचा त्यांचा हेतू आहे.