सुभाष पवार यांचा टोला
मुरबाड : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी लगावला. खड्डे संपल्यानंतर मुरबाड मतदारसंघ लागतो, असे म्हणणाऱ्यांच्या कारकिर्दीत मुरबाड मतदारसंघ खड्ड्यात गेला आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच मुरबाडमध्ये सुभाष पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुरबाड तालुका व बदलापूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याचे सुभाष पवार यांनी जाहीर केले.
गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मुरबाड शहरातील एमआयडीसीतील अनेक उद्योग निघून गेले. त्यामुळे मुरबाडमध्ये तरुणांना रोजगारात वाढ झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.
मुरबाडमध्ये येताना खड्डे संपले की मुरबाड मतदारसंघ सुरू होतो, असे म्हणणाऱ्यांच्या काळातच मुरबाड तालुका व बदलापूर परिसर खड्ड्यात गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली. महायुतीच्या विद्यमान आमदारांच्याविरोधात मुरबाड विधानसभा मतदारसंघात वातावरण आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास सुभाष पवार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आजही आदर आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करता आली, असे सुभाष पवार यांनी नमूद केले. यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मला शिवसेनेबाहेर पडावे लागले, असे सुभाष पवार यांनी सांगितले
मतदारराजा हा महत्वाचा आहे. बदलापूर शहर व परिसरातही महाविकास आघाडीला अपेक्षित मतदान होईल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
ओला दुष्काळ जाहीर करावा
ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातपिकासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीए मागणी सुभाष पवार यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, असे ते म्हणाले.