मुंबई – दिवाळी सण जवळ येत असताना सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० ग्रॅमसाठी तब्बल ४,००० रुपयांनी वाढ होऊन किंमत ७,३०,००० वरून ७,३४,००० रुपये झाली आहे. यामुळे १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,००० वरून ७३,४०० रुपयांवर पोहोचला आहे. दिवाळीच्या काळात सोने खरेदीला मोठे महत्त्व असते. सोने खरेदी करण्याची परंपरा आणि त्याचा शुभकारक भावनेने वाढलेली मागणी ही सोन्याच्या दरवाढीमागची मुख्य कारणे आहेत. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होण्यामुळे मागणी वाढत असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येत आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, महागाईचे दबाव आणि जागतिक राजकीय तणाव यांसारख्या आर्थिक घटकांचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडत आहे. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.त्यामुळे जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या काळात सोन्याची मागणी वाढते. मुंबईत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा (११.६६ ग्रॅम) ८०,००० रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. या भाववाढीमुळे खरेदीदारांमध्ये किंचित चिंता असली तरी, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता कमी आहे. सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे, किंमत वाढल्यासुद्धा खरेदी जोरात सुरू राहण्याची शक्यता आहे.