पुणे – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील सात हजार पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८ हजार ४६२ बूथ आहेत. त्यापैकी सुमारे अडीच हजार बूथ हे पुणे शहराच्या हद्दीत आहेत. २१ लाखापेक्षा जास्त मतदार शहरात आहेत. निवडणूक आयोगाकडून नागरिकांच्या सोईसाठी घराजवळ मतदान केंद्र निर्माण करण्यावर भर आहे, त्यामध्ये मोठ्या सोसायट्यांमधील हॉल घेतले जात आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, शहरात आठ मतदारसंघासाठी आठ निवडणूक कार्यालये सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीच्या कामासाठी मोठे मनुष्यबळ लागते.स्थिर पथक, फिरते पथक, हिशोब तपासणी, अर्ज पडताळणी, कागदपत्र तपासणी या कामासाठीही मनुष्यबळ आवश्यक असते.
शहरातील मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात आल्याने केंद्रातील प्रत्येक खोलीला किमान पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते.पुणे महापालिकेत सुमारे १७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी स्वच्छता सेवेतील कर्मचारी, आरोग्य, पाणी पुरवठा, घनकचरा विभाग या अत्यावश्यक विभागातील कर्मचारी वगळता उर्वरित सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर बोलविण्यात आले आहे.सध्या सात हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे आदेश निघाले आहेत. यामध्ये वर्ग एक ते तीन मधील सुमारे पावणेपाच हजार, महापालिका शाळेतील शिक्षक २ हजार २०० यासह अन्य विभागातील कर्मचारी मिळून ७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.