कणकवली – महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदेगटावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवणार्या भारतीय जनता पार्टीची (भाजपा) रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही सरशी झाली. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ भाजपाने हिसकावून घेतला. येथून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असलेले शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर भाजपाने दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडले आणि अखेर भाजपाचे नारायण राणे यांनी उमेदवारी बळकावली.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेच आहे. आता शिवसेनेत फूट पडली असली तरीही ही जागा शिवसेनेचीच मानली जाते. शिंदे गट ही जागा मिळविण्यासाठी आग्रही होता. विशेषकरून उदय सामंत हे आपले ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्यासाठी प्रयत्न करीत होते. तर दुसरीकडे भाजपाही या जागेवर हक्क सांगत नारायण राणेंचे नाव पुढे करीत होता. दोन्ही बाजू आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावाही करीत होते. पण अधिकृत उमेदवार जाहीर होत नव्हता. काल रात्री शिंदे गटाचे किरण सामंत यांनी अचानक पोस्ट करीत पंतप्रधान मोदींसाठी मी माघार घेत असल्याचे म्हटले.
त्यामुळे या जागेचा वाद संपला असे वाटत असतानाच आज सकाळी किरण सामंत यांनी आपली पोस्ट डिलीट केली. त्यामुळे पुन्हा त्यांच्या दाव्याची चर्चा सुरू झाली. त्यातच उदय सामंत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, थोरले बंधू किरण सामंत हे भावनिक आणि संवेदनशील आहेत. त्यातूनच किरण यांनी ही पोस्ट केल्याचे उदय सामंत म्हणाले. राजकारणात संवेदनशील राहाणे नक्कीच चांगली गोष्ट आहे.परंतु सोशल मीडियावर पोस्ट करणे चुकीचे आहे. या जागेवर आमचा दावा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जो निर्णय होईल तो मान्य राहील.