कर्नाटकच्या कोप्पल येथील कोर्टाने सुनावली शिक्षा
बंगळुरू – कर्नाटकच्या गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात दलित वस्तीला आग लावल्याप्रकरणी कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (24 ऑक्टोबर रोजी) तब्बल 101 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ऍट्रॉसिटी प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची कर्नाटकच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. कर्नाटकमधील गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात 28 ऑगस्ट 2014 रोजी जातीय हिंसाचाराची घटना घडली होती. गावातील दलितांना न्हाव्यांची दुकाने आणि ढाब्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने अचानक हाणामारी सुरू झाली. गावातील अस्पृश्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही दलित तरुणांच्या सक्रियतेमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी दलित वसाहतीत घुसून त्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या आणि अनेकांवर हल्ला केला होता. या घटनेच्या राज्याच्या अनेक भागांत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पीडितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी 117 लोकांना आरोपी बनवले होते. गेल्या 10 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. आता अखेर या खटल्याचा निकाल लागला. दरम्यान, गेल्या 10 वर्षात आरोपींपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 101 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.