उरण – नुकत्याच सुरू झालेल्या समुद्रातील अटल सेतू आणि उरण रेल्वेमुळे उरण ते मुंबई जलप्रवास सेवा संकटात आली आहे. या जल मार्गावरील प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात ही बोटसेवा बंद करण्याची वेळ बोटमालकांवर येण्याची शक्यता आहे.
अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आपली वाहने घेऊन अटल सेतू मार्गावरून प्रवास करू लागले आहेत. तसेच उरण रेल्वेमुळे उरणहून २० रुपयांत मुंबईला जाता येत असल्याने अनेकजण या स्वस्त प्रवासाला प्राधान्य देत आहेत. या दोन्ही प्रवास मार्गामुळे उरण ते मुंबई जलबोट सेवा संकटात सापडली आहे. तसेच उरण ते मुंबईतील भाऊच्या धक्क्यापर्यत बोटीच्या प्रवासासाठी ६५ रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे अटल सेतूने अर्ध्या तासात, रेल्वेने एक तासात आणि बोटीने दोन ते अडीच तास प्रवासाला लागतात. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचत असल्याने पूर्वी दिवसाला १५०० प्रवाशांची येजा करणाऱ्या बोटीने आता जेमतेम २५० प्रवासी प्रवास करत आहेत.