पुणे – ससून रुग्णालयाच्या चार कोटी १८ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या १३ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला. जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडला होता. प्रकार याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. रुग्णालयाच्या वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अर्चना अलोटकर, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, संतोष जोगदंड, दयाराम कछोटिया, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात, तसेच अनिता शिंदे, शेखर कोलार, राखी शहा या व्यक्तींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती.
ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची तथ्ये या चौकशीमधून समोर आली होती. या चौकशी अहवालाच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अधिपरिचारिका अर्चना अलोटकर, अधिपरिचारिका मंजूषा जगताप, वरिष्ठ लिपिक संतोष जोगदंड, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात, अधिपरिचारिका नंदिनी चांदेकर, अधिपरिचारिका सरिता लोहारे, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, सेवानिवृत्त आया सुनंदा भोसले, वरिष्ठ लिपिक सचिन ससार, वरिष्ठ लिपिक पूजा गराडे, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, वरिष्ठ लिपिक दयाराम कछोटिया यांचा समावेश आहे. तसेच, सरिता शिर्के, संदेश पोटफोडे, अभिषेक भोसले, भारती काळे, अनिता शिंदे, सरिता अहिरे, शेखर कोलार, राखी शहा या खासगी व्यक्तींवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता.