कोकणातील उमेदवारांना कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या विचारात घेऊन त्यावर ठोस कार्यवाहीचे आश्वासन देणाऱ्या कोकणातील निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा दिला जाईल. मात्र तसे आश्वासन न देणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, असा इशारा अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने दिला आहे.

याबाबत समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तेवीस रेल्वे प्रवासी संघटनांची एकत्रित काम करणारी संघटना आहे. पालघर जिल्हा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रवाशांसाठी ही संघटना काम करते. प्रा. मधू दंडवते साहेबांच्या अथक परिश्रमातून कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला. अशक्यप्राय असणारी रेल्वे दंडवते यांच्या आशीर्वादाने कोकण रेल्वे चालू झाली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी थोडे प्रयत्न केले, पण त्याचा पाठपुरावा ठोसपणे न केल्याने कोकणातील रेल्वे प्रवाशांना पाहिजे त्या प्रवासी सुविधा मिळाल्याच नाहीत. त्यानंतर कोकणातील एकाही नेत्याने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. फक्त कागदी घोडे नाचवत व आश्वासने देऊन कोकणी माणसाची दिशाभूलच केली. म्हणूनच कोकणवासीयांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, याकरिताच या अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना झाली.

वर्षभरात संघटनेने अनेक उपक्रम राबविले, जनजागृती केली. सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन कोकणवासीयांच्या प्रवासातील व्यथा त्यांच्याजवळ मांडल्या, पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागण्या पुन्हा मांडत असून त्यांचा विचार केला नाही, तर संघटनेचा आणि समस्त कोकणवासीयांचा पाठिंबा उमेदवारांना मिळणार नाही, असे नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे. संघटनेच्या मागण्या अशा – १) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन रद्द करून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे. २) कोकण रेल्वेचे शक्य तितके लवकरात लवकर दुपदरीकरण करणे. ३) सावंतवाडी टर्मिनसची लवकरात लवकर सुसज्ज स्थितीत उभारणी करुन त्या टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देणे. ४) सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी या रेल्वे स्थानकांचा फक्त बाहेरून केलेला कायापालट हा देखावा नको. त्या सर्व रेल्वेस्थानकांची लांबी, उंची, लादी घालणे, पत्राशेड, विश्रामगृह, संडास बाथरूम, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, खानपान व्यवस्था सुरळित करावी. ५) वसई ते सावंतवाडी प्रवासी पॅसेंजर रेल्वे चालू करावी. ६) कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी पॅसेंजर रेल्वे चालू करावी. ७) परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेला कोकणातील प्रत्येक तालुक्यात थांबा द्यावा. ८) सावंतवाडी येथे सर्व गाड्यांना थांबा दिलाच पाहिजे. तरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील प्रवाशांना ‌त्याचा लाभ होईल. या ज्वलंत मागण्या पूर्ण करण्याची हमी जो उमेदवार देईल, त्याला संघटनेतर्फे पाठिंबा दिला जाईल, असे नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech