आरबीआयने इंग्लंडहून परत आणले 102 टन सोने

0

नवी दिल्ली – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) इंग्लंडमध्ये ठेवलेल्या सोन्यापैकी 102 टन सोने परत आणले आहे. यापूर्वी मे महिन्यात आरबीआयने 100 टन सोने परत आणले होते. परकीय चलन साठा व्यवस्थापनाच्या अहवालानुसार सप्टेंबर 2024 पर्यंत आरबीआयकडे 855 टन सोने होते. यापैकी 510.5 टन सोने भारतात असून उर्वरित परदेशात ठेवले होते. लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून आणखी 102 टन सोने धनत्रयोदशीला परत आणल्याचे आरबीआयने सांगितले. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय परदेशात ठेवलेले सोने सुरक्षेच्या दृष्टीने भारतात परत आणत आहे. भारताने सप्टेंबर 2022 पासून परदेशात ठेवलेले 214 टन सोने परत आणले आहे. हे पाऊल आरबीआय आणि सरकारची संपत्ती आपल्या देशातच आपल्या जवळ ठेवण्याला प्राधान्य दर्शवते. सध्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सोन्याच्या साठ्यातील काही भाग देशात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सोने आपल्या देशातच ठेवल्याने ते अधिक सुरक्षित राहील असा सरकारमधील अनेकांचा विश्वास आहे.

या सोन्याच्या वाहतुकीसाठी गुप्तता आणि आधुनिक सुरक्षा उपायांची आवश्यकता असते. ज्यात विशेष विमाने आणि सुरक्षित प्रोटोकॉलचा समावेश असतो. ब्रिटनमधून सोने गोपनीयरित्या विमाने आणि अन्य माध्यमातून आणले जाते. आधीच्या काळात, आर्थिक संकटात भारत सरकारला तारण म्हणून सोने गहाण ठेवावे लागत होते. पण, यावेळी हे पाऊल आर्थिक आणीबाणी म्हणून नाही तर देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्याच्या सक्रिय धोरणाचा एक भाग आहे. सध्या, भारताचा 324 टन सोन्याचा साठा बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या देखरेखीखाली आहे. या दोन्ही बँका ब्रिटनमध्ये आहेत. जगात बँक ऑफ इंग्लंड हे सोने साठा ठेवण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते. ही बँक 1697 पासून जगभरातील सोने साठा ठेवत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech