मुंबई : जवळपास दीड वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नसला तरी कर्जे महाग होत आहेत. देशात विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आधीच जास्त आहेत. आता अनेक बँकांनी कर्जावरील व्याज विशेषत: वैयक्तिक कर्जावरील व्याजात वाढ केली आहे. वैयक्तिक कर्ज महाग करणा-या बँकांमध्ये देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादींचा समावेश आहे. खाजगी क्षेत्रातील या प्रमुख बँकांनी अलीकडेच वैयक्तिक कर्ज ३० ते ५० बेसिस पॉइंट्सने महाग केले आहे. म्हणजे चार मोठ्या खासगी बँकांची वैयक्तिक कर्जे आता ०.३० ते ०.५० टक्क्यांनी महाग झाली आहेत.
रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत रिस्क वेट वाढवले आहे. पूर्वी वैयक्तिक कर्जासाठी रिस्क वेट दर १०० टक्के होता. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०२३ पासून तो १२५ टक्के केला आहे. दुसरीकडे, बँका या नियामक बदलाचा भार स्वत: सहन करत नाहीत आणि ते त्यांच्या ग्राहकांवर लादत आहेत. ज्यामुळे व्याजदर वाढत आहेत. आगामी काळात वैयक्तिक कर्जे आणखी महाग होण्याची भीती असून व्याजदर वाढवणा-या बँकांची यादीही मोठी होऊ शकते.