मुंबई बँक लवकरच २५ हजार कोटींचा टप्पा गाठणार

0

मुंबई बँकेच्या मोबाईल बॅंकिंग सेवेच्या शुभारंभ सोहळ्यात

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई :  डिजिटल क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज ‘मोबाईल बँकिंग सेवा’ सुरू करत एक पाऊल पुढे टाकले आहे. या बँकेत सर्वसामान्यांचा पैसा आहे. ही बँक सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या आर्थिक ताकदीचा उपयोग हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही काम करतोय. ही बँक लवकरात लवकर २५ हजार कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी मोबाईल बॅंकिंग सेवेच्या उदघाटन सोहळ्यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्याला माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते, संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, संचालक विठ्ठलराव भोसले, विष्णू घुमरे, पुरुषोत्तम दळवी, अनिल गजरे, विनोद बोरसे, नितीन बनकर, कविता देशमुख, जयश्री पांचाळ, सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा निबंधक नितीन काळे, कर्मचारी प्रतिनिधी, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह सहकारातील मान्यवर, बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, मुंबई बँकेच्या वाटचालीतील आपण सगळे साक्षीदार आहात. मुंबई बँक कशा पद्धतीने, कलाकलाने प्रगतीकडे गेली या सगळ्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहात. सातशे-आठशे कोटीवर असणारी ही बँक तुम्हा सहकारी संस्थांच्या, सहकारी कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विश्वासावर आम्ही सर्व सहकाऱ्यांनी बँकेचा १४,५०० कोटींचा टप्पा पार पाडण्याचे धाडस केले आहे. आता मोबाईल बॅंकिंग सेवेमुळे तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

आताचे यूग हे डिजिटल युग आहे. आपल्या हातातील मोबाईलवर बँकेची व इतर सर्व कामे होत असतात. डिजिटल लायझेशनमुळे शासनाकडून मिळणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येतात. लाडक्या बहिणींनाही पैसे थेट खात्यात जातात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर हे डिजिटल युग गतीने पुढे जायला लागले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले आमचे मुंबई शहर, त्या शहरात असणारी आमची शिखर बँक त्यापासून वंचित राहू शकत नाही. ती सल आमच्या मनात सातत्याने असायची, आज ती स्वप्न पूर्ण होताहेत याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई हे देशाचे आर्थिक राजधानी असणारे शहर आहे. जगातील अनेक लोकं, खासगी-आंतरराष्ट्रीय बँका मुंबईमध्ये येऊन इथे आपला आर्थिक कारभार करतात. आपली बँक गावाखेड्यातून आलेल्या सर्वसामान्य लोकांची आहे. ज्यात टाटा, अंबानीचा पैसा नाही. सर्वसामान्यांचा पैसा आहे. ही बँक सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या आर्थिक ताकदीचा उपयोग हा मुंबईच्या सर्वसामान्यांना झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही काम करतोय. ही बँक नजीकच्या काळात लवकरात लवकर २५ हजार कोटींचा टप्पा पार करणार असल्याचा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

दरेकर पुढे म्हणाले की, आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट सारखी योजना आणली. विकासक न घेता गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी बँकेकडे आल्या तर आम्ही पैसे देऊ. जवळपास १६०० गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रस्ताव मुंबई बँकेकडे आलेत. आम्ही अनेक गृहनिर्माण सहकारी संस्थांना कर्ज दिले आहे. १२ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला आपल्यामुळे हिंमत देणे, पैसे उपलब्ध करून देणे हे केले तर फायदा होतो हे समजणारी आम्ही लोकं आहोत. या योजनेतून एका गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना २५० स्क्वे. फुटाच्या घरावरून ९२० स्क्वे. फूट इतके घर मिळाले आहे. बँकेचा उपयोग सभासदांना, ग्राहकांना झाला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही काम केले आहे.

सहकारातील सर्व पैसा सहकारतच राहिला पाहिजे. महाराष्ट्रात सहकार खऱ्या अर्थाने वृद्धिंगत व्हावे असे वाटत असेल तर सहकारातील काम सहकारात, सहकारातील पैसा सहकारात, ही भुमिका आपण घेतली तर सहकार आणि मुंबई बँकेच्या उत्कर्षांत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुर्दैवाने आपणच आपल्या बँकेला सक्षम करत नाही. आता मोबाईल बँकिंग सेवा आलीय. तुमच्या हातात बँकेचा व्यवहार आलाय. हौसिंग सोसायट्यासह सहकारातील सर्व सभासदांचे, कुटुंबाचे मुंबई बँकेत खाते असावे, डिजिटलद्वारे कनेक्ट असावे, अशा प्रकारे भुमिका घेतली तर आपली बँक निश्चितच २५ हजार कोटींचा टप्पा पार केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई बँकेला आपण सर्वांनी सक्षम करावे, अशी विंनतीही दरेकरांनी उपस्थितांना केली.

ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा संकट येते त्यावेळी देवेंद्र फडणवीस आमच्या मागे ताकदीने उभे राहतात. आज राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ही बँक ताकदीने पुढे नेऊया. जे प्रलंबित विषय आहेत ते शासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. मजूर संस्था, बेरोजगार सेवा संस्था, हौसिंग सेक्टरचे प्रश्न होते ते आम्ही शासन स्तरावर मार्गी लावलेत.

लाडकी बहीण योजना आली त्यावेळी काही महिलांकडे खाते उघडण्यासाठी पाचशे-हजार रुपयेही नव्हते असे समजले त्यावेळी तात्काळ सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून लाडक्या बहिणींसाठी झीरो बॅलन्स खाते उघडण्याचा निर्णय घेतला. आज ६० हजार महिलांची झीरो बॅलन्स खाती मुंबई बँकेत आहेत. तसेच बँकेला शेड्युल दर्जा मिळाला पाहिजे यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. अहमदाबाद जिल्हा बँकेला जसा शेड्युल बँकेचा दर्जा आहे त्या धर्तीवर आपल्या मुंबई बँकेला शेड्युल दर्जा मिळायला हवा, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. लवकरच तो दर्जा मिळवून घेऊ, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

दरेकर पुढे म्हणाले की, आम्ही लवकरच बँकेचे अभियान सुरू करणार आहोत. ज्यामध्ये सहकारी संस्था, ग्राहक, संस्थांचे संचालक, सभासद यांच्याकडे स्वतः जाऊन खाती उघडणे, एटीएम सुविधा देणे, ग्राहकांशी डिजिटली कनेक्ट करण्याची मोहीम आम्ही सुरू करतोय. जेणेकरून मुंबईतील साधारणतः १० लाख लोकं जोडू, असा संकल्प करूया, असेही दरेकर म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech