मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमाराला प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दिवाळीनिमित्त लोक आपापल्या घराकडे निघाल्यामुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. यासंदर्भातील माहितीनुसार वांद्रे टर्मिनस, वांद्रे (पू) येथील फलाट क्रमांक 1 वर रविवारी पहाटे 2.30 वाजेच्या वांद्रे-गोरखपूर (गाडी क्र. 22921) या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी उसळली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. गाडीत बसण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पोलिसांनाही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. गाडी स्थानकावर येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. यात 9 जण जखमी झाले असून त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 7 जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. जखमींमध्ये शब्बीर अब्दुल रहमान, परमेश्वर सुखदार गुप्ता, रवींद्र हरिहर चुमा, मसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, संजय तिलकराम कांगे, दिव्यांशु योगेंद्र यादव, मोहम्मद शरीफ शेख, इंद्रजित साहनी, नूर मोहम्मद शेख यांचा समावेश आहे. यापैकी इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.