मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई – गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, नवीन पाण्याची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आणि त्यांचा उबाठा सेना हा पक्ष आहे असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला. मुंबईत ठिकठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे, अनेक ठिकाणी पाणीच येत नाही, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांकडे केल्या जात आहेत. आज याबाबत माध्यमांशी संवाद असताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड शेलार म्हणाले की, 90 च्या दशकामध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्या बाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने गठीत केली होती.
या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला. मुंबई महापालिकेने यातील मध्य वैतरणा प्रकल्प 2014 ला पूर्ण केला. त्यानंतर एकही प्रकल्प महापालिकेने हाती घेतला नाही. गारगाई या धरणाच्या परवानग्या आणि नियोजन सुरू झाले होते. मात्र तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार राज्यात आणि महापालिकेत असताना हा प्रकल्प रद्द केला. कंत्राटदारांच्या प्रेमातून अत्यंत महागडा असलेला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 4400 कोटी रुपये होती आता हा प्रकल्प 8000 करोड वर गेला तरी सुद्धा अद्याप त्याची निविदा निघालेली नाही. त्याला प्रतिसाद मिळत नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळ खंडोबा याचे दुष्परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यावरून मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आज हे जे मुंबईत दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे त्याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आहेत. मुंबई ३४% पाणी गळती आहे असे महापालिका सांगते आहे. त्यासाठी कोट्यावधीची कंत्राटे दिली, पण त्याचे पुढे झाले काय ? हे कळायला मार्ग नाही, असे गंभीर आरोप आमदार अशी शेलार यांनी आज येथे केले. समुद्राचे पाणी गोडे करणे याबाबत जागतिक पातळीवर अभ्यासांती सिद्ध झाले आहे की ते पर्यावरण घातक आहे, शिवाय खर्चिक आहे ही बाब आम्ही त्याही वेळा लक्षात आणून दिली होती. मात्र थातूरमातूर कारण देऊन हा प्रकल्प पुढे रेटला व गारगाई प्रकल्प रद्द केला. गारगाई प्रकल्पामध्ये बाधित होणारी झाडांचे पुनर्वसन व नवी वनराई निर्माण करण्यासाठी जागाही निश्चित झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला व आपल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबईत 100 ठिकाणी जल्लोष
मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले. भाजपातर्फे मुंबईत 100 ठिकाणी चौका चौकात याचा आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे मराठी गाणी वाचवून मराठी साहित्यिकांना अभिनंदन करून तसेच काही ठिकाणी दिंडी ग्रंथ प्रदर्शन अशा विविध मार्गातून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे तसेच या कामी शिवसेना उबाटा गटाचा कोणताही सहभाग नाही. ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतची कमिटी गठीत झाली तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा उबाठा सेना त्यांच्यासोबत नव्हती, आज निर्णय झाला तेव्हा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि सरकारमध्ये उबाठा नाही. त्यामुळे याचे श्रेय लाटू नये, याबाबत श्रेय घेणारे संजय राऊत आता नागडे झाले आहेत, अशी खरमारी टीका आमदाराची शेलार यांनी केली
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं शक्य होणार आहे. त्यातून नोकरीच्या संधीत वाढ होईल विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. व काँग्रेसने मराठीवर अन्याय केला होता तो दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.