मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कक्ष म्हणजे रुग्णसेवा कक्षाकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाला महत्त्व आले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री साहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे केले होते. फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात प्रकाश शेट्ये यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती. तर रामेश्वर नाईक यांच्याकडे गेल्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी होती. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून नाईक यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याआधी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे हे या विभागाचे प्रमुख होते. चिवटे यांना पदमुक्त केल्याने एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बेस्ट बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती.