मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाकडून जाहीर होणाऱ्या जाहीरनाम्यासत समाविष्ट करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, व्यावसायीक, तंत्रज्ञ, महिला आदी समाजातील सर्व घटकांनी विकासात्मक सूचना पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र भाजपा जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यासाठी visionformaharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा पत्राद्वारे अथवा 9004617157 या व्हॉट्सअप उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुनगंटीवार यांनी याबाबत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक लवकरच येऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी सुरू केली आहे. समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाच्या क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासक आहे. आपल्या अनुभव, ज्ञान, आणि कौशल्याचा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी उपयोग व्हावा, असा आमचा मानस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. भारताला जागतिक पटलावर मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. यापासून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि गतिमान असा विकास होईल, असा आराखडा तयार करीत आहे. या आराखड्याचा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या सखोल अभ्यासावर आधारित सूचना आम्हाला या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यास मदत करावे. जेणेकरून राज्याच्या प्रगतीत सकारात्मक योगदान मिळू शकेल. महाराष्ट्राचा पुढील पाच वर्षांसाठी सर्वसमावेशक आणि स्थायी विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना पाठवाव्यात अशी आपणास विनंती आहे.