नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या इंडि आघाडीत मतभेत असल्याचे अधोरेखित झालेय. काँग्रेसकडून अदानीच्या मुद्यावर बुधवारी संसद भवन परिसरात झालेल्या निदर्शनाकडे समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. तोच प्रकार आज, गुरुवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी आज, गुरुवारी काँग्रेस खासदारांनी संसद भवन संकुलात अदानी मुद्द्यावर निदर्शने केली. काँग्रेस खासदारांनी संसद सभागृहात अदानी मुद्यावर चर्चा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर बोलावे तसेच अदानी प्रकरणावर संसदीय समिती स्थापन करावी अशा मागणी केली.
दरम्यान, या निदर्शनाला तृणमूल, समाजवादी खासदारांनी अनुपस्थित राहत ‘संसदेत मांडण्यासाठी इतर मुद्दे असल्याचे’ म्हणत पुन्हा एकदा अदानी विरोध टाळला आहे. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने पुन्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या संकुलात आयोजित केलेल्या गौतम अदानी लाचखोरी प्रकरणाच्या निषेधापासून दूर राहिल्यानंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याच्या कथेला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ति आझाद यांनी सर्व विरोधक एकत्र असल्याचे सांगतानाच अदानी सोडून इतर अनेक मुद्दे अग्रक्रमाने घेण्यासारखे असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे बाहेरून इंडि आघाडी एकत्र असल्याचे दाखवत असली तरीही आतून मात्र सुप्त संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे.