नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीत नियमभंग केला असा आरोप करीत त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केल्याचा आरोप करणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकाकर्ते सूरज मिश्रा यांनी याचिकेतून केली आहे. सदर याचिकेवर उच्च न्यायालयाने गडकरी यांना नोटीस बजावली आहे.
गडकरी 2014 पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी 6 लाखाहून अधिक मते प्राप्त केली. त्यांच्या विरोधी उमेदवाराला 4 लाखाहून अधिक मते प्राप्त झाली. गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वालाख मतांच्या फरकाने जिंकली होती. या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला आहे. बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार ऍड. सूरज मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने गडकरी यांना नोटीस बजावत 3 आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर नाताळाच्या सुटीनंतर सुनावणी होणार आहे.
याचिकेनुसार, नागपूर लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रांवर गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. मतदारांना एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती देणारी चिठ्ठी दिली जात होती. या चिठ्ठीवर निवडणुकीत उमेदवार असलेले गडकरी यांचे छायाचित्र होते. नियमानुसार मतदान केंद्र परिसरात उमेदवाराच्या नाव असलेल्या चिठ्ठ्या वितरीत करता येत नाही. याबाबत याचिकाकर्ते यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, मात्र यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. याचिकाकर्त्याने यानंतर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. नागपूर लोकसभा निवडणुकीत नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, निवडणुकीचा निकाल रद्द करून ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी आदी मागण्या याचिकाकर्त्याने केल्या आहे.