मुंबई – मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ चे उद्घाटन ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून, सकाळी ११ वाजता या मार्गावरील सेवा सुरू झाली.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) या प्रकल्पात पहिला टप्पा साकारला होता. त्यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकमुक्त आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळाला. मंगळवारपासून ही मेट्रो सेवा सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ६.३० ते रात्री १०.३०, तर रविवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत चालणार आहे.
आरे-बीकेसी मार्गिकेवर दररोज ९६ फेऱ्या नियोजित केल्या आहेत. प्रत्येक मेट्रो गाडी दर साडेसहा मिनिटांनी सुटणार आहे. या मेट्रोमुळे प्रवाशांना आरे, जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी१, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत आणि बीकेसी अशा प्रमुख ठिकाणी सहज पोहोचता येणार आहे. सध्या या मार्गावर ट्रॅफिकमुळे एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे, परंतु भुयारी मेट्रोमुळे हे अंतर फक्त २२ मिनिटांत पार करता येईल. प्रवाशांसाठी तिकीट दर १० ते ५० रुपयांदरम्यान ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीही हा प्रवास परवडणारा आहे. बीकेसी मेट्रो स्थानकात उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बीकेसी ते सांताक्रुझ मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. त्यामुळे मेट्रोचा जलद आणि आरामदायक प्रवास अनुभवता आला. मुंबईतील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरली असून या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.