विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी घेतली फडणवीसांची भेट

0

* रिपब्लिकन पक्षाला किमान 5 जागा तरी मिळणार

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज भाजपचे राज्यातील प्रमूख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याबाबत चर्चा केली. यावेळी राज्यभरातील चर्चेला दिलेल्या 10 ते 12 जागांपैकी 5 ते 6 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निश्चित जागा सोडणे आवश्यक असून त्याबाबत आज महायुतीच्या तीन मोठ्या पक्षांसोबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.

यावेळी रामदास आठवलेंच्या नेतृत्त्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेल्या रिपब्लीकन पक्षाच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात केज जिल्हा बीड, यवतमाळ मधील उमरखेड विधानसभा मतदारसंघात महेंद्र मानकर; त्यानंतर धारावी, चेंबूर, श्रीरामपूर, पिंपरी, उत्तर नागपुर, देगलूर या 7 जागांवर रिपब्लिकन पक्षाने दावा केला असून यातील किमान 5 जागा रिपब्लिकन पक्षाला सुटतील, अशी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महायुतीचे पुन्हा सरकार आल्यावर रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यावे; एक विधानपरिषद सदस्यत्व द्यावे, 3 महामंडळांचे अध्यक्ष पद; 3 उपाध्यक्षपदे द्यावीत; सर्व महामंडळाचे सदस्यत्व द्यावे, तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात, अशा विविध मागण्या रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली.

सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे; गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990 च्या मुदतीत वाढ करून 14 एप्रिल 2014 पर्यन्त पात्रता निश्चित करावी तसेच एस आर ए योजनेत मिळणारी घरे छोटी असून 450 चौ.फुटांचे घर झोपडीवासियांना देण्यात यावे या मागण्यांचा महायुती सरकार ने पुन्हा सत्तेत येण्यासाठी विचार करावा, अशी सूचना आठवले यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech