राज्यात एक दिवसाचा दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

0

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयावरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशीच भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे. त्यांच्या मुंबईतील कुलाबा स्थित निवासस्थानी सकाळी मुंबई पोलीसांकडून मानवंदना देण्यात आली.

दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून नरिमन पॉइंट ते वरळी दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. वरळीत सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार आहेत, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech