मुंबई : वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजारामुळे त्यांचे मुंबईत निधन झाले. दीपक बोरकर हे वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच तालवाद्य वाजवण्यात निष्णात झाले. त्यांनी यशवंत देव, प्रभाकर पंडित, सुधीर फडके, गजानन वाटवे, स्नेहल भाटकर, ह्रदयनाथ मंगेशकर, खय्याम, जतीन ललित, आनंद मिलिंद, अशोक पत्की आणि आजकालच्या नव्या संगीतकारांबरोबरही अतिशय उत्साहाने काम केले तसेच जयवंत कुलकर्णी, जसजित सिंग, तलत मेहमूद, फाल्गुनी पाठक, अशोक हांडे यांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा मुख्य सहभाग असे. संगीत संयोजक आप्पा वढावकर यांच्या तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग असे. जसजित सिंग, तलत मेहमूद अशा अनेकांबरोबर त्यांनी देशाबरोबरच परदेशातही अनेक दौरे केले.
फाल्गुनी पाठक यांचा नवरात्रीतील दांडिया त्यांच्याशिवाय पूराच होत नसे. सिनेमा, टीव्ही सिरीयल्स, नाटकं, जाहिराती इत्यादी सगळ्यांसाठी त्यांनी तालवाद्य वाजवली. तालवाद्यावरील त्यांची हुकूमत इतकी होती की तालवाद्यांमध्ये दीपक बोरकर हा अखेरचा शब्द असे. अतिशय चांगल्या स्वभावामुळे ते संगीत क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण वादक व संगीत क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी नूतन आणि कुटुंबीय आहेत