सलमानच्या हत्येचा कट: बिष्णोई गँगचा शूटर अटकेत

0

मुंबई – नवी मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका शूटरला हरियाणातील पानिपत येथून अटक केली आहे. सुखा असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने सुखाला अटक केली. त्याला नवी मुंबईत आणून कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सलमान खानच्या हत्येची योजना करण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात पोलिसांना सलमानला पनवेलमधील फार्महाऊसजवळ टारगेट करण्याचा कट असल्याची माहिती मिळाली होती. याआधी एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’च्या बाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता, ज्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सलमानच्या घरातील बाल्कनीला गोळी लागली होती. या गोळीबार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा संशय सलमानने व्यक्त केला होता.

बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या आहेत. २०२२ मध्ये सलमानच्या घराबाहेर धमकीचं पत्र सापडलं होतं, तर मार्च २०२३ मध्ये ई-मेलद्वारे त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नेहरा गँगने सलमानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ६० ते ७० लोकांना नेमले होते. त्यांच्या हालचालींवर पनवेल फार्महाऊस, वांद्रे येथील घर आणि फिल्म सेट्सवर नजर ठेवण्यात आली होती. अधिक माहिती मिळाल्यानंतर पनवेल पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी काही जणांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. सलमानच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech