मुंबई विभागातून ८०० भाविक अयोध्येकडे रवाना

0

तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी – मुख्यमंत्री

मुंबई – ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे. योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संदेशामधून केले. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून आज रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या तीर्थयात्रेकरुंच्या प्रवासाला सुरूवात झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळते ही भाग्याची गोष्ट असून याचे समाधान वाटते. पुढील काळात शेगाव, पंढरपूर बोधगया, दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणीही या तीर्थदर्शन यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यातून निवडलेला लाभार्थी हा भारतातील एकूण ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’तून वृद्धावस्थेत उपयुक्त उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे सहाय्य शासनाने दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मंत्री केसरकर यांच्या हस्ते गोपीचंद देसाई, चंद्रभागा वरेकर या यात्रेकरूंना प्रातिनिधिक स्वरूपात तिकीट देण्यात आले. मंत्री श्री.केसरकर यांनी रेल्वेच्या डब्यात जावून प्रवासी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी आज रवाना झाले आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, वंदना कोचुरे यांनी दिली.

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक पथक सोबत असणार आहे. यात्रेकरू अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते,पारंपरिक नृत्य यावेळी सादर करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, आय.आर.सी. टी .सी चे गौरव झा, सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech