भावनिक ऐक्य वाढण्यासाठी उत्तर पूर्व राज्यांना भेट द्यावी – राज्यपाल

0

मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत नागालँड (१ डिसेंबर) व आसाम (२ डिसेंबर) राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या रविवारी (दि. १) साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना राज्यपाल म्हणाले. आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

आज देशातील केंद्र शासनातर्फे विविध राज्यांमधील युवकांना इतर राज्य जाणून घेण्याची संधी दिली जात आहे. अलीकडेच आपण ‘वतन को जानो’ व ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीर तसेच ओडिशा येथील युवकांना भेटलो असे सांगून केंद्र सरकारच्या या उपक्रमांमुळे युवकांना भारताची विविधता व संपन्नता पाहण्यास मिळते, असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनतर्फे एसएनडीटी महिला विद्यापीठ व ‘ईश्वरपूरम पुणे’ या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले. राज्य स्थापना दिवस साजरे करताना आपल्याला विविधतेतून सामान भारतीय मूल्ये दिसून येतात. त्या त्या प्रदेशांचे गीत, नृत्य, लोककला व खाद्य संस्कृतीची माहिती होते.

राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘ईश्वरपूरम’ संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले. तर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech