मुंबई – बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० दिव्यांग बालकलावंतानी आपली कला सादर केली. काहीना वन्समोअरचा प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थातर्फे बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात आली. सांस्कृतिक कला प्रदर्शनासोबतच परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री एड नीलम ताई शिर्के यांच्या प्रास्ताविक भाषणाने आणि प्रत्येक स्टाॅलला भेट देऊन प्रोत्साहन दिल्याने सर्व सहभागी संस्था कलाकारात आनंदी वातावरण निर्माण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनास बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचे अध्यक्ष राजीव तुलालवार, कार्यावाह आसेफ अन्सारी, कार्याध्यक्ष ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनील सागवेकर उपस्थित होते. उद्घाटन व स्टाॅल भेटीस अभिनेत्री अर्चना नेवरेकर, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर आवर्जून उपस्थित होत्या.
अर्चना नेवरेकर यांनी या उत्तम संकल्पना व आयोजनासाठी एड नीलम शिर्के-सामंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच आपण या कामी नेहमीच सोबत असू असे आश्वासन दिले. बालरंगभूमीचे स्वरूप केवळ मनोरंजनात्मक न राहता ती लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हणजे दिव्यांग मुलांसाठी ‘यहाँ के हम सिकंदर’ या कला महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून देण्याचा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांचा मानस आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना एड नीलम शिर्के-सामंत यांनी समाजातील प्रतिष्ठित,कलाप्रेमी मान्यवरांना व समस्त नागरिकांना आवाहन केले की,” ही मूल विशेष आहेत त्यांच्या विविध वस्तूंची खरेदी करुन आपल्या दिवाळी भेटीत त्यांचा समावेश करावा,आपली दिवाळी त्यांच्या आकर्षक वस्तूंनी साजरी करावी जेणेकरून या मुलांना आर्थिक बळ मिळेल, कलागुणांना प्रोत्साहन मिळेल,” दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम प्रवाहात आणण्यासाठी अॅड. नीलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून सदर महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास पाच हजार रुपये मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग कालावंतांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर सहभागी शाळेतील शिक्षकांचा देखील गौरव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या महोत्सवांतर्गत विविध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी करण्यात येऊन विक्रीतून आलेली रक्कम त्या त्या शाळेलाच देण्यात आली. मुंबई शाखेतील सर्व पदाधिकाऱी तसेच लवु क्षीरसागर गणेश तळेकर आदी सदस्यांच्या उत्तम नियोजन सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला.