त्र्यंबकेश्वर – नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे एकूण सहा आमदार आहेत, हिरामण खोसकर आपले सातवे आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर येथे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रमुख नेत्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे प्रकल्प मार्गी लागून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागणार आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. त्यामुळे आज राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे. या योजनेची सर्व जबाबदारी ही अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांनी लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. महायुती सरकारकडून प्रत्येक घटकांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, ” दोन-तीन दिवसांपूर्वी हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला. यानंतर आता इतरांचा होणार आहे.आता निवडणुकीचा काळ असून काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. अनेक लोक आमच्याकडे येतात, खोसकर देखील कामानिमित्त माझ्याकडे यायचे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. महायुती, महाविकास आघाडी, मनसे, हौशे नवशे गवसे सर्व उभे राहतील, पण तुम्ही महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या, असे म्हणत अजित पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली.