नाशिक – इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले होते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचे आरोप आहेत. पक्षाने दोन दिवसांपूर्वीच खोसकर यांची हकालपट्टी केल्याचा दावा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
खोसकर यांनी काॅंग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्याबाबत विचारले असता पटोले बोलत होते. त्यांंच्या जाण्याने पक्षाला कोणतेही नुकसान होणार नाही. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमधील मतदार हा काँग्रेस विचारसरणीशी जोडलेला आहे. खोसकर हे काँग्रेसच्या विचारांमुळेच निवडून आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार खोसकर यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
ज्यांनी काँग्रेससोबत फारकत घेतली ते निवडून येत नाहीत हा इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील इतिहास असल्याचा दाखला पटोले यांनी यावेळी दिला. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात उमेदवार स्थानिक राहील, असे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.