पुणे – करोना काळात एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू केली. यातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्या पुणे विभागातून मालवाहतुकीला मागणी असताना एसटी महामंडळाकडून वाहने उपलब्ध होत नसल्याने मालवाहतूक सेवा ठप्प आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवा चार वर्षांपूर्वी राज्यभर सुरू केली होती. यासाठी दोन हजार जुन्या बसचे मालगाडीत रूपांतर करण्यात आले होते. वाजवी दर, खात्रीशीर सेवा आणि सुरक्षिततेमुळे या सेवेला खासगी आणि सरकारी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
सुरुवातीला पुणे विभागात ७८ बसद्वारे मालवाहतूक सेवा सुरू होती. त्यामुळे दिवसाला १० ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, सध्या पुणे विभागात मालवाहतूक बस उपलब्ध नसल्याने सेवा ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे एसटीच्या मालवाहतूक गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने फायद्यात असणारी मालवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. सुरुवातील ज्या बस उपलब्ध होत्या त्यातील काही बसेस स्क्रॅप झाले, तर काही मोडीत काढण्यात आल्या त्यामुळे एसटीची मालवाहतूक बंद करण्यात आला आहे, असे महामंडळाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.