ठाणे – १९१९-२० पासून देशात वेळोवेळी पशुगणना करण्यात आली. तेव्हापासून ही पशुगणना दर ५ वर्षांनी एकदा केली जाते. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने आतापर्यंत अशा २० पशुगणना केल्या आहेत. पशुगणना केवळ धोरणकर्त्यांसाठीच नाही तर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग, सर्वसामान्यांसाठीही फायदेशीर ठरते. यामुळे पशुधनासाठी धोरण आखणे सोप्पे जाते. २० वी पशुगणना २०१९ मध्ये झाली होती आणि आता ही गणना देशभरात होत असताना ठाणे जिल्ह्यात देखील केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे, गाई, बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे. घरोघरी आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी महापालिका सहाय्य करणार असून प्रथमच मोबाइलमार्फत ही गणना प्रगणक करणार आहेत. चार हजार घरामाग एका प्रगणकाला काम करावे लागणार असल्याची माहिती डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशसंवर्धन उपआयुक्त ठाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.
राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेतर्फे गणना करताना महापालिकेकडून प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. तसेच या क्षेत्राशी निगडीत संस्थाचीही मदत घेण्यात येत आहे. पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागात ७२ प्रगणक, १४ पर्यवेक्षक असून एकूण ८६ कर्मचारी तसेच शहरी भागात २५६ प्रगणक, ४७ पर्यवेक्षक असून एकूण ३०३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. चार हजार घरांमागे एका प्रगणकाला गणना करण्याची जबाबदारी असेल. तर दहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक काम पाहणार आहे. मोबाइल मार्फत ही गणना होणार असून तो तीन महिने चालेल.
ठाण्यात २०१९ मध्ये झालेल्या पशुगणनेची माहिती
गाय, बैल – ८०५३२
म्हैस वर्ग – ९५४१५
बकरे, शेळ्या-मेंढ्या – ६३३३४