डोंबिवली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार राजू पाटील, आणि ठाणे विधानसभा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कल्याण-शीळ रोडवर मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू पाटील यांनी ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी आणि प्रभू श्रीरामांची भव्य अशी प्रतिमा भेट दिली.
यावेळी ठाकरे म्हणाले, उमेदवारी यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय, एक-दोन दिवसांत दुसरी यादी जाहीर होईल. त्याआधीच कल्याण ग्रामीणसाठी राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदार संघासाठी अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच येत्या २४ तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी येणार असून तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी यावं, असे आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले.
दरम्यान उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे यांचे आभार मानले. तसेच राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यासाठी जातात तिकडे उमेदवारी जाहीर करत असून कल्याण ग्रामीण आणि ठाण्याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही निवडणूक लढण्यासाठी मुद्दे भरपूर आहेत, मुद्दे आणि गुद्दे सोबत घेऊनच निवडणूक लढणार आहे, पाच वर्षात तीन मुख्यमंत्री, दोन-तीन राज्यपाल पाहिले आहेत. कोविडमध्ये सुरू असलेलं राजकारण या गोष्टी लोकं विसरलेले नाहीत, त्यामुळे उडालेला बोजवारा, बिघडलेली राजकीय संस्कृती हे सर्व लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे राजू पाटील म्हणाले.