‘केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे’

0

• ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन
• चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थींशी संवाद

ठाणे : अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडित पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात. अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणमिमांसा, त्याचे परिणाम यांचे आकलन होऊ शकणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते, असे प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.

ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५च्या निमित्ताने संवाद साधला. त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचे स्वागत केले. तर, प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केले. त्याप्रसंगी, संस्थेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते.

वित्तीय तूट, त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केले. कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो, हे कायम लक्षात ठेवायला हवे. गिग इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी, विमा क्षेत्रातील १०० टक्के परकिय गुंतवणुकीस मान्यता, अणू उर्जेत खाजगी क्षेत्रास प्रवेश आदी निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील, असे कुबेर म्हणाले.

तसेच, लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचे धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी १०० अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, रोजगार निर्मितीही होईल, असेही कुबेर यांनी स्पष्ट केले. कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले. त्याला कुबेर यांनी उदाहरणासहीत सविस्तर उत्तरे दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech