– मित्रपक्षावर उघड उघड नाराजी
डोंबिवली – रामभाऊ कापसेनंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाला संधी मिळाली नाही. या विधानसभा मतदार संघात शिवसेनेने अनेकवेळा निवडणूक लढविली होती. मात्र शिवसेनेचा उमेदवार निवडून आला नाही. आता मात्र या मतदार संघात कमळ चिन्हावर उमेदवार उभा राहावा अशी आमची इच्छा आहे. आमची ताकद येथे जास्त आहे. आमचा उमेदवार नंदू परब असावा असे एकमताने कार्यकर्ता जाहीर मेळाव्यात सांगण्यात आले. महायुतीने लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांनी एकत्र लढावली होती. आगामी विधानसभा निवडणूकही एकत्र लढविण्याची शक्यता असूनही भाजपा व शिवसेनेत उघड उघड नाराजी दिसत आहे.
रविवारी 13 डोंबिवली भाजपा ग्रामीण मंडळ कार्यालय शेजारी भाजपा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, नागेद्र शर्मा, डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, रविसिंग ठाकूर, रवींद्र पाटील, दत्ता माळेकर, रेखा चौधरी, अर्चना सूर्यवंशी यांसह अनेक पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थिती होते.
यावेळी मेळाव्यात पदाधिकारी म्हणाले, कार्यकर्ता हा आपल्या पक्षासाठी काम करत असतो. भाजपाने मित्र पक्षासाठीच काम करायचे का ? कल्याण ग्रामीण मतदार संघात भाजपाकडून नंदू परब यांना उमेदवार मिळालीच पाहिजे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यत हे आपले म्हणणे पोहचणे आवश्यक आहे. जर कल्याण ग्रामीण मतदार संघात कमळ चिन्हच असले पाहिजे आणि उमेदवार नंदू परब असला पाहिजे अन्यथा आमची बंड करण्याची तयारी आहे असे सांगण्यात आले.
यावेळी रविसिंग ठाकूर म्हणाले, गेल्या 15 वर्षापासून एकच निशाणीवर मतदान करावे लागले. मात्र आता ही उमेदवारी दान म्हणून आम्ही देणार नाही. या मतदार संघातून कमळ चिन्हावरच उमेदवार उभा असावा आणि तो उमेदवार नंदू परब असावा. नागेद्र शर्मा म्हणाले, भाजपाचा धडाडीचा कार्यकर्ता नंदू परब को आनेसे कोई नहीं रोक शकता. ओबीसी मोर्च्याचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकित महाराष्ट्रात मतदानाचा टक्का मोठा होता. आता महायुतीत कोणती जागा हवी व कोणती जागा सोडावी हे वरिष्ठ ठरवतील. आपल्या सर्वांची इच्छा वरिष्ठापर्यत जाणे आवश्यक आहे. ही विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी अशी आपली इच्छा आहे.
यावेळी इच्छुक उमेदवार नंदू परब म्हणाले, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ निवडणूक कमळ चिन्हावरच लढली पाहीजे हे मी उपस्थित कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्यासमोर सांगतो. शिवसेनेने आम्हाला आव्हान करू नका. आम्ही हात जोडतो, विनंती करतो कि उमेदवार भाजपच असला पाहिजे हे वरिष्ठ यांना सांगा. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मित्रपक्ष शिवसेना तीनवेळा हरले होते. नानाजी तुम्ही आमचा आवाज म्हणून वरिष्ठ नेत्यांना सांगा. ही विधानसभा भाजपाला दिली तर कोणत्याही कार्यकर्त्याना उमेदवारी द्या आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता मेहनत घेऊ.
अखेर जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले, इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीची राजकीय ताकद मोठी आहे. आपली मागणी रास्त असून या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतल्या आहेत आपले म्हणणे वरीष्ठ नेत्यांपर्यत पोहचू. यावेळा मला अपेक्षा आहे कि ही जागा भाजपाला मिळेल. कल्याण ग्रामीण विधानसभेत जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी काम केले पाहिजे.