कल्याण – अनाधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार, आता अधिक तीव्र मोहिम उघडण्यात आली असून महापालिकेकडे प्राप्त झालेल्या व्हिडीओच्या क्लीपच्या आधारे अनधिकृत बांधकाम करणा-यां विरुध्द काल टिटवाळा (कल्याण तालुका पोलीस स्टेशन) ठाणे-ग्रामीण येथे महापालिकेच्या अ प्रभागामार्फत FIR दाखल करण्यात आला आहे.
चाळींचे अनाधिकृत बांधकाम करुन रुम विक्री करणेबाबतची व्हिडीओ क्लिप व्हॉट्सॲपव्दारे प्रसिध्द झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने अ प्रभागातील अनाधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी उंभर्णी गाव येथे सर्व्हे नं.९,१०,५४ येथे बांधकामाची पाहणी करत असता के.एफ.इंटरप्राइजेस तर्फे अब्दुल अतिक फारुकी बनेली टिटवाळा पूर्व यांनी चाळींचे अनाधिकृत बांधकाम करुन सदर रुम सदनिका धारकांना विक्री करण्याचे निदर्शनास आले, त्यामुळे अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त संदिप रोकडे यांच्या निर्देशानुसार १/अ प्रभागातील अनाधिकृत बांधकाम विभागाचे अधिक्षक नंदकिशोर सोनु वाणी यांनी उंभर्णी गाव सर्वे नं. ९, १० व ५४ येथे परवानगी न घेता ४ ते ५ अनधिकृत चाळींचे (एकूण ३० रुम्स) बांधकाम करणारे बांधकामधारक अब्दुल अतिक फारुकी यांच्यावर टिटवाळा (कल्याण तालुका पोलीस स्टेशन) ठाणे-ग्रामीण येथे महाराष्ट्र प्रादेशिक नगरनियोजन अधिनियम १९६६ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये FIR दाखल केला आहे.