मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘माझी टीएमटी’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण

0

* प्रवाशांना मिळणार मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा
• प्रवाशांना बसचे ठिकाण तसेच ती किती वेळात स्टॉप वर येणार हे जाणून घेण्याची सुविधा
• सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळणार

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘माझी टीएमटी’ (Mazi TMT) या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲपमुळे प्रवाशांना यूपीआयद्वारे डिजिटल तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या ही सुविधा काही बसमार्गावर सुरू करण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या सर्व बसमार्गांवर प्रवाशांना वापरता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (११ ऑक्टोबर २०२४) धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिकेचे लोकार्पण केले. त्याच ठिकाणी ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ‘माझी टीएमटी’ (Mazi TMT) या मोबाईल ॲपचेही लोकार्पण करण्यात आले. या मोबाईल ॲपद्वारे तिकिट काढण्याची पद्धत, बसमधील वाहकाकडून त्याचे केले जाणारे व्हेरिफिकेशन याचा डेमो याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहिला. प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येईल. तसेच, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगचा वापर करून पैसे भरता येतील. त्याचप्रमाणे, प्रवाशांना बस कोठे आणि किती वेळेत स्टॉपवर येणार याची माहिती देण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. प्रवाशांना ॲपवर प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्य स्थान यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बसगाड्या, त्यासाठी लागणारे तिकिट भाडे याचीही माहिती मिळणार आहे.

डिजिटल तिकिटांच्या व्यवस्थेमुळे वाहकांची रोख रक्कम हाताळण्याची संख्या कमी होईल आणि सुटे पैसे नसल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद यामुळे टळतील, अशी अपेक्षाही टीएमटी व्यवस्थापनाला आहे. सध्या ॲपद्वारे तिकिटांची ही सुविधा काही बसमार्गावर सुरू करण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या सर्व बसमार्गांवर प्रवाशांना वापरता येणार असल्याचे टीएमटी व्यवस्थापनाने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech