ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 41 हिंदी भाषिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उथळसर परिसरात मुख्य रस्त्यावर मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. मतदान का आवश्यक आहे, सुयोग्य उमेदवार कसा निवडावा या बाबी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात आल्या. या पथनाट्यला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लोकांना लोकशाहीने मतदानाचा एक शक्तिशाली अधिकार दिला आहे. मतदान हा लोकशाहीच्या घोषणेचा आधारस्तंभ आहे. एखाद्याला खरोखरच राष्ट्र-निर्माण प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल आणि बदल घडवून आणायचा असेल तर मतदान करणे आवश्यक आहे. अशा संवादाने नागरिकांना आपल्या मताचे मोल त्याच्या ताकदीचा परिचय पथनाट्याद्वारे करून देण्यात आला.
या पथनाट्य कार्यक्रमात, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव उपस्थित सर्व मतदारांना करून देण्यात आली. सर्वांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्व मतदारांनी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान त्यांना करण्यात आले.