मुंबई : अनंत नलावडे
राज्यात भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून महायुतीचे सरकार स्थापन होवून तब्बल महिनाभराचा काळ लोटला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र बुधवारी पुन्हा प्रकर्षाने दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगरविकास विभागाशी संबंधित बोलावलेल्या बैठकांना ज्यांच्याकडे हा विभाग आहे त्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चक्क पाठ फिरवल्याने या दोघात अद्यापही बेबनाव असल्याचे आज उघड झाले.
महायुती सरकार स्थापन होत असताना झालेला मंत्रिमंडळ विस्तार व त्यांनंतर पालकमंत्री पदाचे वाटप यावरून गेली दोन वर्षे सख्खे सोबती राहिलेले फडणवीस यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही.आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या निर्णयावर निर्बंध तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह त्यांच्या मंत्र्यांना निर्णय घेण्यापासून खुली छूट. रायगड व नाशिक या दोन महत्वाच्या जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ जास्त असतानाही त्यातुलनेत कमी संख्याबळ असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला पालकमंत्री पदांची खुली खैरात आदी विविध मुद्द्यांची किनार या बेबनावला कारणीभूत असल्याचे मानण्यात येते. त्यामूळेच आज नगरविकास विभागांच्या बैठका बोलावूनही शिंदे यांनी दुर्गाडी किल्ल्यावर मलंग बाबांच्या सानिध्यात दिवस घालवणे पसंत केल्याची चर्चेले मात्र यानिमित्ताने उधाण आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या बैठकींमध्ये शिंदे अनुपस्थित राहणे, यावर राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेच पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे महायुतीतील अंतर्गत तणावाची स्थिती स्पष्ट होऊ शकते. आता प्रश्न आहे की, मुख्यमंत्री फडणवीस या परिस्थितीला सामोरे जातांना शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलतात? त्यांची नाराजी खरंच किती गंभीर आहे आणि यामुळे महायुती सरकारवर कोणते परिणाम होऊ शकतात, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरेलअसे मानले जाते