ठाणे – न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढण्यासाठी लोकअदालत व मध्यस्थी प्रक्रिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून वाद कायमस्वरूपी व जलद गतीने मिटला जातो. त्यात वेळेची व पैशांची बचत होते. व या बाबींचा समाजात प्रसार झाल्याने मोठया प्रमाणात लोकन्यायालयास यश मिळत आहे.
दि.27 जुलै 2024 रोजीच्या ‘‘राष्ट्रीय लोकअदालत’’ मध्ये विविध बाबींमध्ये ठाणे जिल्हा आघाडीवर –
1) प्रलंबित 35 हजार 151 प्रकरणे निकाली :- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. त्यात सर्व जिल्हा, तालुके, उच्च न्यायालय खंडपीठ अशी 40 ठिकाणांचा समावेश होता. त्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1 लाख 41 हजार 352 प्रलंबित प्रकरणे निकाली झाली. त्यात एकटया ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित 35 हजार 151 प्रकरणे निकाली झाली.
2) अत्यंत जुनी प्रकरणे :- या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अत्यंत जुनी अशी एकूण 2 हजार 815 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली 10 वर्षे, 20 वर्षे व 30 वर्षे जुनी असलेली एकूण 1 हजार 212 प्रकरणे निकाली काढण्यात यश.
3) मोटार अपघात दावे निकाली प्रकरणांमध्ये ठाणे अव्वल :- ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्यांची एकूण 492 प्रकरणे तडजोडीने निकाली. एकूण 53 कोटी 53 लाख 93 हजार 461/- रूपयांची तडजोड. एका मोटार अपघात दाव्यामध्ये विक्रमी तडजोड. सर्वाधिक रक्कम रूपये 2 कोटी 85 लाख रूपयांची तडजोड.
4) जलद गतीने निवाडा :- तसेच एका मोटार अपघात दावा क्र. 744/2024 मध्ये दावा दाखल झाल्यापासून फक्त 14 दिवसांत म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वात जलदगतीने नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. (Debts Recovery Tribunal) डी.आर.टी. प्राधिकरणाद्वारे 123 प्रकरणे निकाली. एकूण तडजोडीची रक्कम रू. 43 कोटी 34 लाख 24 हजार 704/-.
वैवाहिक प्रकरणे :- कौटुंबिक न्यायालयातील वैवाहीक प्रकरणांमधील वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी व कौटुंबिक संबंध पुनःप्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामध्ये वैवाहिक वादाच्या एकूण 122 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट. त्यापैकी 14 प्रकरणांत पती-पत्नी एकत्र नांदावयास गेले. बेलापूर न्यायालयात एका प्रकरणात डॉ.आर.आर.तेहरा, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, बेलापूर यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मध्यस्थी करून इंग्लंडमधील जोडप्यामध्ये यशस्वीपणे समेट घडवून आणली. (N.I.Act.) एन.आय. अॅक्ट कलम 138 च्या धनादेश प्रकरणांतील जुनी प्रलंबित 1 हजार 498 प्रकरणे निकाली होवून त्यात 38 कोटी 49 लाख रक्कमेची तडजोड.
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रसारमाध्यमांचेही उत्कृष्ठ सहकार्य मिळत आहे. राष्ट्रीय लोकअदालतध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून विदेशातील पक्षकारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लेाकअदालतीमध्ये सहभाग नोंदविला व प्रकरणांत यशस्वी तडजोड करण्यात आले. त्याचबरोबर ऑनलाईन व व्हॉट्सअॅपच्या मदतीने बहुतांश प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जुन्या प्रकरणांना प्राधान्य देवून ती प्रकरणे निकाली काढण्याबाबत आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा न्यायालय, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती व त्याद्वारे नोटीस बजावणीकामी विशेष पथक नेमून समन्स व नोटीसची बजावणी करण्यात आली. व त्यामुळे जुनी 2 हजार 815 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे श्री. श्रीनिवास ब्रि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये शनिवार, दि.27 जुलै, 2024 रोजी ‘‘राष्ट्रीय लोकअदालत’’ चे आयोजन करण्यात आले होते.
मागील काही राष्ट्रीय लोकअदालतीचा आलेख पाहिला असता नागरीकांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्व पटल्याचे प्रकर्षाने दिसून येते. प्रसारमाध्यमे तसेच समाजातील प्रत्येक स्तरामध्ये करण्यात आलेल्या कायदेशीर जनजागृती शिबिरांमुळे सामान्य जनतेस लोकअदालत व त्यातून होणारा न्यायनिर्णयाचे महत्व प्रकर्षाने जाणवत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालत तसेच मध्यस्थी प्रक्रिया याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते व त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व अधिनस्त तालुका न्यायालयांची मिळून एकूण 96 पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण 35 हजार 151 प्रलंबित प्रकरणे व 17 हजार 921 दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण 53 हजार 072 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाले.
‘‘राष्ट्रीय लोकअदालत’’ यशोगाथा.
मयतांचे वारस व जखमींना दिलासा :- ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण 492 प्रकरणांत तडजोड होवून पिडीतांना रक्कम रू.53 कोटी 53 लाख 93 हजार 461/- भरपाई मंजूर करण्यात आली. सदरच्या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयातील पॅनल मा. न्यायाधीश श्रीमती सोनाली एन. शाह यांच्या पॅनलकडे एकूण 360 प्रकरणांमध्ये तडजोड होवून रू. 35 कोटी 39 लाख 54 हजार 961/- एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आली.
तसेच या पॅनलकडे प्रकरण दाखल केल्यापासून केवळ 14 महिन्यांत प्रकरण तडजोडीने निकाली निघाले. मोटार अपघातात जखमी झालेल्या पिडीतेचा नुकसान भरपाई दावा माहे जुलै 2024 मध्ये दाखल झाला होता. सदर पिडीता लंडनमध्ये वास्तव्यास असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तिच्याशी संपर्क साधून या दाव्यात तडजोड घडवून आणली. या दाव्यात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वकील अॅड. श्री. केशव पुजारी व अर्जदारातर्फे अॅड. श्रीमती सचिन माने यांनी विशेष प्रयत्न केले.
या पॅनलकडील आणखी एका प्रकरणात मोटार अपघातातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना एच.डी.एफ.सी. अरगो इन्श्युरन्स कंपनीकडुन उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून रूपये 2 कोटी 85 लाख चा धनादेश देण्यात आला व एका मोटार अपघात दाव्यामध्ये बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीतर्फे नुकसान भरपाई म्हणुन रूपये 1 कोटी 15 लाख मंजूर करण्यात आले. तसेच पालघर न्यायालयाकडील एका प्रकरणामध्ये उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून रक्कम रूपये 41 लाख 50 हजार मंजूर करण्यात आले,अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.
वैवाहिक वाद प्रकरणांत पुनर्मिलन करण्यात यश :- कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथील श्रीमती आर.आर.तेहरा, न्यायाधीश, यांनी पॅनलवरील एका वैवाहिक वाद प्रकरणात ज्यात दोन्ही पक्षकार इंग्लंडमध्ये वास्तव्यास असून दोन्ही पक्षकारांनी आभासी पध्दतीने (व्हीडीयो कॉन्फरन्सद्वारे) हजर राहून सुनावणीत भाग घेतला व पती व पत्नीमध्ये यशस्वीरित्या समेट घडवून आणण्यात विषेश प्रयत्न करुन दोन्ही पक्षकारांचे वैवाहिक वाद संपवून पुनर्मिलन केले. तसेच नव्याने स्थापित बेलापूर कौटुंबिक न्यायालयातून 08 वैवाहिक प्रकरणात पुन्हा नव्याने संसार जुळले.
तसेच शहापूर न्यालयात एका घटस्फोटाच्या प्रकरणात लोकअदालत पॅनल प्रमुख श्री. के. के. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांनी प्रकरणातील पती व पत्नी यांना त्यांचे वैवाहिक आयुष्यात जोडीदारांचा सहभाग, त्यांच्या मुलाचे शैक्षणिक व मानसिक नुकसान व अन्य बाबी समजावुन सांगून त्यांचे मनपरिवर्तन करून समुपदेशन केल्यामुळे त्यांच्यामध्ये समेट घडून आला व पती व पत्नी एकत्र राहण्यास तयार होवून घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.
वाहतूक खटल्यांचा निपटारा :- ठाणे जिल्हयात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने अनेक नागरिकांवर मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हे दाखल असून अशी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती पोहोचविण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. श्री. विनय राठोड, मीरा-भाईंदर, नवी मुंबईचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे (ग्रामीण) यांनी विशेष प्रयत्न केले.
या लोकअदालतीस ठाणे जिल्हयातील सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत कदम, वकील संघटनेचे पदाधिकारी, सरकारी अभियोक्ता, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी वित्तीय संस्था, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या परिश्रमाने व उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठया प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश संपादन झाले आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव, श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे.