ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर “सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम” अर्थात स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी ठाणे शहरात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्यक्षरीत्या बस मध्ये विद्यार्थ्यांसोबत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बस मध्ये विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी चक्क बस मध्ये “आई-बाबास पत्र” हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, “आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान क्रेंद्रावर जाऊन मतदान करावे”. तसेच विद्यार्थीवर्गानी विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर करण्यात आला . “मतदान करा, मतदान करा.. लोकशाहीचा विजय करा” या संकल्पनेतून सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी न चुकता मतदान करा, असा प्रेरक संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला.