ठाणे रेल्वे प्रश्नांबाबत खा. म्हस्के यांची मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

0

ठाणे – खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मुलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले.

कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या.

एलटीटी कुर्ला-मडगाव-मंगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्याने आरक्षण उपलब्ध होत नाही. मुंबई शहर हे महानगर असल्याने या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालविण्याची गरज असून त्यानुसार सीएसएमटी आणि एलटीटी कुर्ला तसेच ठाणे ते नाशिक, पुणे, मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी ठाणे-मडगाव 2 रोजच्या गाड्या, ठाणे-सावंतवाडी-2, ठाणे-मंगलोर – 1 ठाणे-कोची/त्रिवेंद्रम – 2, ठाणे-नाशिक – 2, ठाणे-मिरज – 1 आणि ठाणे-पुणे दररोज 2 गाड्या सोडाव्यात तसेच ठाणे-बोरिवली मार्गावर ईएमयू गाडी सुरू करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

ठाणे लोकसभा मतदारसंघ येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. अशा रेल्वे स्थानकांचे रेल्वेने वेळोवेळी सर्वेक्षण केले पाहिजे जेणेकरुन त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल. जसे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृहे आणि महिलांची स्वच्छतागृहे असावीत. स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिन असावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, फूट-ओव्हर ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एस्केलेटर अशा सुविधा होणे महत्त्वाचे आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या दिशेने अर्थपूर्ण पावले उचलावीत, अशी आशा चर्चे दरम्यान खा. नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech