ठाणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिवा, देसाई, मनेरा, अंजूर, आलमगड या ठिकाणी होणाऱ्या अवैध दारु विक्रीबाबत कडक कारवाई करुन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टीम तयार करणे व ड्रोनद्वारे माहिती घेवून तसेच परराज्यातून येणारी दारु वाहतूकीसाठी चेक पोस्ट तयार करुन कडक कारवाई करण्यात यावी.
10 लाख रुपयांच्या वरती रोख रक्कम सापडल्यास ती तात्काळ आयकर विभागाकडे जमा करण्यात यावी. बँका, पतसंस्था, सहकारी संस्था यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम सापडल्यास ती कोषागार किंवा उपकोषागारात जमा करावी. याचे सर्व अहवाल निवडणूक विभागाला सादर करावे लागतात. जीएसटी विभागाने गोदाम, पेट्रोलपंपावर होणाऱ्या लक्ष ठेवावे. रेल्वेद्वारे होणाऱ्या पैशाची वाहतूक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्टेशनवर पथके नेमावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार सर्व कार्यालय स्थापन केल्याबाबत विचारणार केली. त्यांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. निवडणूक विषयक दैनंदिन अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या. कायदा व सुव्यस्था अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे. कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. सिंगल विंडोबाबत सर्व परवानग्या एकत्र भेटतील याकडे लक्ष द्यावे. निवडणूक विषयक येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. पोस्टल मतदानाबाबत संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करुन त्याची माहिती जमा करावी. प्रशिक्षणाचे योग्य नियोजन करावे, मतदान केंद्र तयार करताना त्या ठिकाणी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात.