टी-२० सामन्यात पाकिस्तानवर थरारक विजय
नेहमीप्रमाणेच अत्यंत अटीतटीच्या झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यात भारतानेच विजय मिळवला. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत केले.
न्यू यॉर्क – पावसामुळे प्रथम फलंदाजी करताना खेळपट्टीने उभे केलेले आव्हान, बेसबॉल सामन्यांसाठी वापरलं जात असल्याने सवयीच्या नसलेल्या सीमारेषा आणि सूर्याचा लपंडाव… या सगळ्याचा फटका बसूनही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारतीय क्रिकेट संघाने पराभूत केले. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ६ धावांनी मिळवलेला हा थरारक विजय, गोलंदाजांचा होता आणि सामनावीर जसप्रित बुमराह त्याचा शिल्पकार ठरला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्माने पहिल्याच षटकात शाहीनशाह आफ्रिदीला षटकार ठोकून इरादे स्पष्ट केले. पण दुसऱ्याच षटकात नसीम शाहच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून झोकात सुरुवात करणारा विराट कोहली पुढच्याच चेंडूवर झेलबाद झाला. रोहितलाही नंतर फारसे काही करता आले नाही. मात्र नंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने डाव सावरला. काही जीवदानांचा लाभ घेत पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी भारतीय डावात सर्वोच्च ठरली. त्यानंतर मात्र ठराविक अंतराने भारतीय फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले आणि भारताचा डाव २० षटकेही पूर्ण चालला नाही.
पाकिस्तानी फलंदाजांनी १२० धावांच्या आव्हानासमोर झोकात सुरुवात केली. पण नंतर मात्र भारताने जिद्दीने गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूने झुकवला. ऋषभ पंतचे तीन झेल आणि बुमराहसह गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांची मात्रा चालू शकली नाही.
बुमराहने टाकलेल्या १५व्या षटकापासून गोलंदाजांनी फास आवळायला सुरुवात केली. एकाही भारतीय गोलंदाजाने पाकिस्तानी फलंदाजांना मोठा फटका खेळू दिला नाही. त्याचं दडपड पाकिस्तानी फलंदाजांवर येत गेलं. बुमराहने १९व्या षटकात इफ्तिखार अहमदला बाद करून पाकिस्तानी फलंदाजांना जणू भीमटोलाच दिला. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज असलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी दोन चौकार लगावले तरी त्यांना ११ धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना जिंकला.
पाकिस्तानचे आव्हान धोक्यात!
या विजयामुळे भारताचे २ सामन्यांत ४ गुण झाले आहेत. मुख्य आव्हान असलेल्या पाकिस्तानला नमवल्याने भारताची सुपर ८ कडील वाटचाल सोपी झाली आहे. तर आधी अमेरिका आणि भारताकडूनही झालेला हा पराभव पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणू शकतो.