सिन्नर – बदलापुरात चार वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवर खिळल्या होत्या. बदालपुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाहीत, तोच नाशकातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. नराधमानं चार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयितानं हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली. याप्रकरणी आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे वय 26 या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 19 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडल्याचं समोक आलं. फिर्यादीनुसार तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा 351/2024, 137(2),64(1),65 (2) प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहे.