मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, साहित्यिक डॉ. अलका नाईक यांना नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ च्या वतीने २५ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न झाला.
वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, मौखिकता ही भाषेची मौलिकता असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका, समाजसेविका डॉ.अलका नाईक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, उद्योजक शिवहर मेरे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
आपली कविता सादर करतांना ‘अवयव दान करा आणि नवजीवन द्या’ हा संदेश डॉ.अलका नाईक, मुंबई यांनी सर्वांना दिला.
● नक्षत्राचं देणं काव्यमंच कार्यकर्त्यांसाठी *नक्षत्र गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात येतो. यावेळी
कवी रामदास घुंगटकर, यवतमाळ, कवी चेतन ठाकरे, गडचिरोली ; कवयित्री सौ वृषाली टाकळे-रत्नागिरी;
कवयित्री डॉ. अलका नाईक-मुंबई; कवी किशोर वरारकर; चंद्रपूर, ॲड्. जयराम तांबे-ओतूर, डॉ. शीलवंत मेश्राम, चंद्रपूर, कवी सुनील बिराजदार सोलापूर अशा अनेक नक्षत्रांना मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांच्या शुभहस्ते
कवी नवनाथ पोकळे- बापाची सावली, कवी तुषार डावखर-डोंगर द-याचा मुलुख, कवी अक्षय पवार-उन्हाळ्यातही फुलणारा गुलमोहर तसेच माझ्या मनातील पाऊस -प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन सौ रुपाली भालेराव यांनी केले.
सलग सहा तासाचा हा भव्य सोहळा विश्वगीत पसायदानाने संपन्न झाला.