अश्विन शुद्ध अष्टमी दिवसी अनेक ठिकाणी श्रीमहालक्ष्मी पुजन व्रत केले जाते. कहाणी (व्रतकथा) नुसारच्या व्रतात देशकालानुरुप बदल होत गेला आहे. या दिवशी चित्तपावन ब्राह्मण ज्ञातीत मूळ व्रतगाभा कायम राखून एक आगळावेगळा व्रतोत्सव साजरा होतो. सध्या नवविवाहित सुवासिनीनी आचरण्याचे हे पाच वर्षाचे काम्य व्रत असले तरी उत्सव आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा असतो.
या व्रतात सोळा संख्येला महत्व असून पूर्वी व्रतही सोळा वर्षे करीत असत बालविवाहाच्या कालातली ही प्रथा संपून पाच वर्षे प्रचारात आली असावीत. मात्र आजही सोळा सुताच्या तातूचे (दोरकाचे) व्रतकंकण बांधतात. सोळा प्रकारची पत्री, (सोळा प्रकारची फुले, फळे, दूर्वा, अलंकार वगैरे उपलब्धतेप्रमाणे) पुजेत वाहतात. सोळा दिव्यांची आरत, सोळा दिवे मुठे वायन, असे शक्यतेनुसार करतात. ब्राह्मणाला वायननदान व सर्वाना भोजन. भोजनानंतरचा व्रताचा उत्तरार्ध उत्सवी असतो.
कोकण हा पूर्वी (व बहुतांशी आजही) दुर्गम प्रदेश. कोल्हापुरच्या अंबाबाईचे हे व्रत. कोल्हापुरला जाणे त्याकाळी कठीण. या दिवशी तिचे सगुण साकार दर्शन व्हावे या हेतूने कहाणीतील म्हातारी रुपातल्या देवीने व्रतीना सकाळी कुमारी, दुपारी सवाशीण, संध्याकाळी प्रौढा या रुपात दर्शन दिले. याचा आधार घेत त्या दिवशी सायंकाळी प्रौढा रुपातल्या श्रीमहालक्ष्मीची पूर्णाकृती पूर्ण उंचीची उत्सवमूर्ती भक्तजन साकारतात. त्या उत्सवमूर्तीत दुपारच्या अर्पित योग्य उपचारासह प्रतिमा अंतर्भूत करतात.
पूर्वी सुयोग्य आकाराचे डबे, मुड्या, तांब्ये तपेली धान्य भरुन रचून त्याला कापडी हात जोडून मूर्तीचे धड साकारीत. काही ठिकाणी लाकडी पुनःपुन्हा वापरण्यायोग्य सांगाडे होते. मुखवटा मात्र सर्वत्र तांदुळाच्या पिठाच्या उकडीचाच. हा मुखवटयाचा आकार केवळ हातानी दाबून करतात. नाक कानादी अवयवाची कोणतीही मोडतोड करुन पुन्हा बनवत नाहीत. त्यामुळे देवीच्या इच्छेनुरुप मुखवटा होतो अशी समजूत आहे. वस्त्रालंकारानी सजवून देवीची दृष्ट काढतात. नंतर विधिवत सायंपूजा आरती मंत्रपुष्प वगैरे होऊन मातीच्या घागरीचे धूपाने शुध्दीकरण पूजन होते या नंतर होते व्रताच्या विशेष अशा घागरी फुंकण्याला सुरवात. प्रथम वशिऱ्या व्रतांग म्हणून या नव्या पुजलेल्या घागरी फुंकतात. या वेळी काही भक्तांच्या अंगात देवीचा संचार होतो अशी समजुत आहे. भाविकाच्या अडीअडचणीवर ते मार्गदर्शन करतात. ही घागरी फुंकण्याची किया ही मुळात फुगडी नसावी. काही आध्यात्मिक किवा तांत्रिक विद्येशी संबधित असावी. निर्जीव पार्थिव घटात प्राण फुंकण्याची ही प्रतिकात्मक किया असावी. कारण हे घडे नवे कोरे असून धुपाने शुध्द करतात. धूपाच्या धुर विषाणूनाशक (अँटिव्हायरल) आहे. नंतर तो घड़ा फुंकून त्यात प्राण किवा चेतना जागृत होत असावी कारण इतर देवीच्या व्रतात वशिऱ्यांच्या अंगात देवीचा संचार होत नाही अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा विषय आहे. मूळ कहाणीनुसार हे व्रत सर्व स्त्री-पुरुषांसाठी आहे. वित्तपावन स्त्रीया किवा एका विशिष्ट वर्गासाठी नाही. चित्तपावनात परंपरेने हे व्रत पुढे चालू आहे.
सामुदायिक फुगडया, खेळ, फेर वगैरेनी सर्वजण देवीचा जागर करतात. उपस्थिताचे श्रीदर्शन, ओटया भरणे वगैरे चालचू असते. हळदीकुंकु तीर्थप्रसाद अल्पोपहार होतो. पहाटे विसर्जन होऊन मुखवटा जलाशयात विसर्जित केला जातो.
हा कोकणची प्रादेशिक वैशिष्ठये जपणारा व्रतोत्सव आहे. धनलक्ष्मी बरोबरच धान्यलक्ष्मी, अन्नपूर्णा यानाही यात प्रतिष्ठा आहे. हा वसा (व्रत) अनेक वशिऱ्या (व्रती) एकत्रितपणे एखद्या सुयोग्य घरी/ठिकाणी वसतात. कोकण म्हणजे भात. व्रतातील आपला वस्तुरुप सहभाग पसापायली (सुमारे साडेतीन किलो) तांदुळाच्या रुपातच त्या कर्त्याच्या घरी देतात. गणपती पुजनाचा नारळ तांदुळावर अधिष्ठीत पुजेतल्या प्रतिमेलाही तांदुळांचेच आसन. अक्षताही तांदुळांच्या. देवीला पुजेत वहायची लेणी (दागदागिने) तांदुळपिठाचे सोळा दिवे तांदुळ पिठाचे, वाणासाठी सोळा दिवे व मुठे तांदुळांच्याच उकडीचे आणि ते इतर भोजनाबरोबर खाऊन पचवणारे भातखाऊही कोकणचेच. यावर वरकडी म्हणजे उत्सवमूर्तीचा मुखवटा (शीर) सुध्दा तांदळांच्या पिठाच्या उकडीचाच.
या व्रतोत्सवाचे स्वरूप पर्यावरण पूरकही आहे. विशेषतः उत्सवमूर्ती. यातील फक्त मुखवटा पाण्यात विसर्जित होतो. बाकी वस्तू पुन्हा वापरता येतात. मुखवटयाची उकड हे जलचरांचे अन्न असते. तसेच शिजवलेल्या अन्नापासून बनवल्याने तो नासू नये म्हणून बनवताना व नंतरही स्पर्श (सोवळे) टाळला जातो. मूर्ती सभोवतीचे वातावरण स्वच्छ, शुध्द व पवित्र राखतात. तसेच वापरलेले रंग हे साजुक तुपात हळद, पिंजर व काजळ या पासून बनवलेले असल्याने ते खाऊन जलचाराना कोणताही त्रास होत नाही. सध्या इतर रंग वापरल्यास ते खाद्य रंग असावेत याची दक्षता घेतली जावी. सकाळपर्यंत जलाशय स्वच्छ होतो. कोणतीही विद्रुपता राहत नाही. असा हा व्रतोत्सव या वर्षी १० आक्टोबरला आहे ही श्रीलक्ष्मीमाता सर्वाना सुखी राखो.
श्री. हनुमंत महाबळ
मुक्काम पोस्ट तळकट,
तालुका दोडामार्ग,
जिल्हा सिंधुदुर्ग.
mahabalhanumant@gmail.com
मो. 75884 47370