देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता हरपला…….!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अनंत नलावडे

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार आणि ‘भारतकुमार’अशी ओळख लाभलेले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटविश्वातील एक उज्ज्वल युग संपुष्टात आले आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “चित्रपट माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर ठसवणाऱ्या या अष्टपैलू कलाकाराने ‘भारतकुमार’ हे बिरूद सार्थकी लावले. त्यांच्यामुळे देशप्रेमाची भावना सामान्य नागरिकांच्या मनात अधिक खोलवर रुजली.”

‘शहीद’ चित्रपटात भगतसिंग यांच्या भूमिकेद्वारे त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची ठसठशीत छाप उमटवली. शेती आणि ग्रामीण भारतावर भाष्य करणारा ‘उपकार’ चित्रपट, त्यातील ‘मेरे देश की धरती’ हे गीत आजही स्वातंत्र्यदिनी अभिमानाने गुणगुणले जाते.‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजप्रबोधन आणि राष्ट्रीयतेचा झरा कायम ठेवला.

मुख्यमंत्री म्हणाले की,“मनोज कुमार हे केवळ अभिनेता नव्हते, तर एक उत्कृष्ट दिग्दर्शक,पटकथालेखक,गीतकार, संकलक होते.त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्धीमध्ये मोलाची भर घातली.”

त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित केले.त्यांच्या निधनाने फक्त हिंदी सिनेसृष्टी नव्हे तर संपूर्ण देशाने एक श्रेष्ठ राष्ट्रप्रेमी कलाकार गमावला आहे.”त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech